बारामाती :प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या काटेवाडी बस कोयता हल्ला प्रकरणातील एक दुःखद बातमी समोर आली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वर्षा रामचंद्र भोसले (वय 43, रा. यादगार सिटी,बारामती) यांचे पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
ही घटना ३१ जुलै रोजी बारामती तालुक्यातील काटेवाडीजवळ घडली होती. वर्षा भोसले या वालचंदनगर येथील माहेरी जाण्यासाठी बारामती-वाळूंज बसमध्ये प्रवास करत होत्या. बस सुरू असताना, मागील सीटवर बसलेल्या अविनाश शिवाजी सगर (वय 21, रा. लातूर, सध्या रा. सोनगाव, ता. बारामती) याने अचानक बसच्या मध्यभागी बसलेल्या पवन अनिल गायकवाड या तरुणावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात पवन गायकवाड जखमी झाला.
बसमध्ये त्या वेळी वर्षा भोसले यांच्यासह अनेक महिला व विद्यार्थिनीही प्रवास करत होत्या. अचानक घडलेल्या या हल्ल्यामुळे बसमधील प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी बसमधून उड्या घेतल्या. हल्ल्यानंतर आरोपी सगर हा बसमधून खाली उतरून पळणाऱ्या प्रवाशांमागे धावू लागला. वर्षा भो यांनीही जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र पळत त्या जमिनीवर जोरात कोसळल्या आणि गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागून मेंदूत रक्तस्त्राव झाला.
या घटनेनंतर वालचंदनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. जखमी वर्षा भोसले यांना प्रथम बारामती औद्योगिक वसाहतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.
सलग पाच दिवस मृत्यूशी झुंज देत, अखेर बुधवारी वर्षा भोसले यांची प्राणज्योत मालवली. त्या वाणेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक रामचंद्र भोसले यांच्या पत्नी होत्या. या दुर्दैवी घटनेमुळे बारामती शहर आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नागरिकांकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात असून, बससारख्या सार्वजनिक ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
0 Comments